Advertisement

Responsive Advertisement

११ रुपयांचा आयव्ही सेट तब्बल ३२५ रुपयांना! खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय साहित्याच्या दरांवर तुकाराम मुंडेंचा आक्षेप


सोलापूर प्रतिनिधी : खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याच्या किमतींमध्ये मोठी तफावत असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सर्वेक्षणातून समोर आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या दरांबाबत आक्षेप नोंदवत वैद्यकीय उपकरणे आणि हॉस्पिटल कंझ्युमेबल्सच्या किंमत नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. 

FDAच्या सर्वेक्षणात खासगी रुग्णालये वैद्यकीय साहित्य कोणत्या दराने खरेदी करतात आणि त्यावर किती MRP आकारली जाते किंवा रुग्णांकडून किती रक्कम घेतली जाते, याची तुलना करण्यात आली. या पाहणीत काही वस्तूंच्या खरेदी किंमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरामध्ये प्रचंड अंतर असल्याचे आढळले. 

सर्वेक्षणातील सर्वाधिक चर्चेत आलेले उदाहरण म्हणजे IV Infusion Set. रुग्णालयाने हा सेट सुमारे ११.०५ रुपयांना खरेदी केल्याचे नमूद आहे; मात्र त्याची छापील MRP ३२५ रुपये होती. या फरकाचा उल्लेख सुमारे २,८४१ टक्के मार्कअप म्हणून करण्यात आला आहे. 

याशिवाय ६.७५ रुपयांना खरेदी केलेल्या १० ml सिरिंजची MRP ५७.२० रुपये, तर २९.४१ रुपयांना खरेदी केलेल्या कॅथेटरची MRP ३१० रुपये असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. 

वैद्यकीय साहित्याच्या इतर प्रकारांमध्येही अशीच मोठी किंमत तफावत आढळल्याचे अहवालात नमूद आहे. काही नेब्युलायझर व ऑक्सिजन मास्क किटची खरेदी किंमत सुमारे ४० ते ४५ रुपये असताना त्यांची छापील किंमत ६५० ते ७१५ रुपयांपर्यंत असल्याचे आकडे समोर आले आहेत. 

याशिवाय विविध प्रकारच्या कॅथेटर, एक्स्टेंशन लाईन, सर्जिकल साहित्य आणि इतर हॉस्पिटल कंझ्युमेबल्समध्येही खरेदी किंमत आणि MRPमध्ये मोठी तफावत नोंदवण्यात आली आहे. 

रुग्णालयात उपचार घेत असताना कोणत्या वैद्यकीय वस्तूची खरी खरेदी किंमत किती आहे, याची माहिती सामान्य रुग्णाला उपलब्ध नसते. शिवाय उपचाराच्या गरजेच्या वेळी रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक पर्यायी वस्तू किंवा दरांची तुलना करू शकत नाहीत, असा मुद्दा तुकाराम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमतीतील पारदर्शकता हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. 

या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंडे यांनी Department of Pharmaceuticals आणि National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) यांच्याकडे सर्वेक्षणाची माहिती पाठवून वैद्यकीय उपकरणे व हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक कंझ्युमेबल्सच्या किंमतींबाबत योग्य नियमन करण्याची मागणी केली आहे. ट्रेड मार्जिनला मर्यादा, संरचित किंमत निरीक्षण आणि आवश्यक उपकरणांना प्रभावी किंमत-नियमनाच्या चौकटीत आणण्यासारख्या उपायांचा विचार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

रुग्णालयीन उपचारांच्या एकूण खर्चात औषधांसोबतच सिरिंज, आयव्ही सेट, कॅथेटर, ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर यांसारख्या वस्तूंचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदी किंमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांमध्ये मोठी तफावत असल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या अंतिम बिलावर होऊ शकतो.

FDAच्या सर्वेक्षणाने या दररचनेतील पारदर्शकतेचा आणि नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आणला असून, आता केंद्र सरकार आणि NPPA या शिफारशींवर कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments