Advertisement

Responsive Advertisement

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरी १२ तासांत उघड, २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.


सोलापूर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी तसेच इतर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील कंपाउंडच्या भिंतीलगत, मार्केट चौकी ते हरिभाई प्रशाला या मार्गावर दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या MH-13-DF-5334 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली.माहितीची खात्री करून पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांची नावे मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय ३६, व्यवसाय ड्रायव्हर, रा. उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर; मूळ रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय १८ वर्षे २० दिवस, रा. उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर) अशी असल्याचे निष्पन्न झाले.
दोघांकडील पिशवीतील रकमेबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकानाजवळून पायी जाणाऱ्या एका वयस्कर इसमाचा पाठलाग करून दमदाटी केली आणि त्यांच्याकडील रोख एक लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेत मोटारसायकलवरून पळून गेल्याची माहिती चौकशीत समोर आली.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून रोख १ लाख रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे १ लाख रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल, असा एकूण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत या जबरी चोरीचा छडा लावला.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे तसेच पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे आणि शंकर याळगी यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments