Advertisement

Responsive Advertisement

संकल्प सेवा अभियानातून ग्रामस्थांच्या सेवेला नवी दिशा; दर्जेदार सेवा देण्याचा सीईओ कुशल जैन यांचा अधिकाऱ्यांना संदेश.


मंगळवेढा पंचायत समितीसह माचनूर, बोराळे येथे पाहणी; शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

सोलापूर - प्रतिनिधी : “संकल्प सेवा अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष, पारदर्शक आणि दर्जेदार लाभ मिळवून द्या. गावाच्या विकासासोबतच नागरिकांना उत्तम सेवा देणे हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अधिकाऱ्यांना केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात संकल्प सेवा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मंगळवेढा पंचायत समितीसह माचनूर व बोराळे येथे भेट देऊन ग्रामविकासाची विविध कामे आणि शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
दौऱ्यादरम्यान ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत माचनूर व बोराळे येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यानंतर कुशल जैन यांनी शाळा व अंगणवाडींना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच अंगणवाडीतील विविध सुविधांची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान संकल्प सेवा अभियान, ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, घरकुल योजना, शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, जी-राम-जी योजना, शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळा व अंगणवाडींच्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शासकीय योजनांचा लाभ देताना केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचली पाहिजे, यावर कुशल जैन यांनी विशेष भर दिला. ग्रामपातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी नियमित समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी घरकुल लाभार्थ्यांच्या नवीन घरकुल प्रवेशाचा कार्यक्रम कुशल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.तसेच बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. केंद्रातील विविध विभाग, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णसेवेचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन (NQAS) मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.या दौऱ्यात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी जास्मिन शेख तसेच पंचायत समितीचे विविध तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments