Advertisement

Responsive Advertisement

मुळेगाव गोळीबार प्रकरणात पिस्टल पुरविणारा जेरबंद : गोळीबारासाठी वापरलेले आणखी एक पिस्टल पोलिसांनी केले हस्तगत;आरोपी संदेश कांबळे अटकेत


सोलापूर (प्रतिनिधी)- मुळेगाव परिसरात कॅश लुटण्याच्या उद्देशाने चालकावर गोळीबार केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर तालुका पोलिसांनी आणखी एका आरोपीला जेरबंद केले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना पिस्टल पुरविणारा संदेश खंडू कांबळे (वय २६, रा. बामणी, ता. व जिल्हा धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून आणखी एक पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत हा धक्कादायक प्रकार घडला होता. ऍपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी हा दिवसभराचे कलेक्शन कंपनीच्या मालकाच्या घरी घेऊन जात असताना पांढऱ्या रंगाच्या इरटिका कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याला अडविले.
कॅश लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी चालकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले. यातील छरा चालकाच्या छातीच्या उजव्या बाजूस लागल्याने तो जखमी झाला. या प्रकरणी एजाज तांबोळी यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आठ आरोपी यापूर्वीच अटकेत- या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी यापूर्वीच आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, सत्तुर, इरटिका कार आणि दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तपासादरम्यान गोळीबारासाठी आरोपींना पिस्टल पुरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे संदेश खंडू कांबळे याला दिनांक १६ सप्टेंबर रोजी अटक केली.
पोलिस कस्टडी; आणखी पिस्टल जप्त- अटक करण्यात आलेल्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १०, सोलापूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिस कोठडीत तपास सुरू असताना आरोपीकडून आणखी एक पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. त्यामुळे मुळेगाव गोळीबार प्रकरणातील शस्त्रसाखळीचा तपास आता अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई - ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, PSI महेश घोडके, ASI विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशी कोळेकर, अनंत चमके, महेश कटकदौंड, फिरोज मियावाले, पैगंबर नदाफ आणि फिरोज बारगीर यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments