Advertisement

Responsive Advertisement

*कंदलगावात महिलांना मारहाण करून जबरी चोरी सहा लाखाचे दागिने व रक्कम चोरट्यांनी लुटली*

 सोलापूर - प्रतिनिधी 

कंदलगाव येथील शेतातील दोन वस्तीवर बुधवारी मध्यरात्रीनंतर घरफोडी व जबरी चोरीची घटना घडली. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी चाकू, काठी व सळईने महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील व घरातील सोने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
कंदलगावात शेतातील वस्तीवर मध्यरात्री ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांच्या टोळक्याने महिलांना मारहाण करून धुमाकूळ घातल्याने वाड्या वस्तीवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंद्रुप पोलिस ठाण्यात या चोरीच्या घटनेची नोंद झाली. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, गुंजेगाव रस्त्यावरील महादेवी गौरप्पा कोरे यांच्या शेतातील वस्तीवरील घरात रात्री चार चोरट्यांनी दोन वयोवृद्ध महिलांना जबर मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्या घराचा दरवाजा उघडला. महादेवी कोरे व त्यांची आई भौरव्वा यांना काठीने व लाथा बुक्क्याने मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील डब्यात ठेवलेले रोख १० हजार रुपये असे एकूण दोन लाख ४८ हजार रुपयाची चोरी केली. त्यानंतर तेथून हे चोरटे पसार झाले.

नंतर या चोरट्याने आपला मोर्चा विंचूर रस्त्यावरील वस्तीकडे वळवला. कंदलगाव - विंचूर रस्त्यावरील 
रेवप्पा बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवर आले. त्यांच्या घरामध्ये घुसून घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून काठीने व सळईने मारहाण केली. 
सुनेच्या गळ्यातील सोने व एकाच्या गळ्यातील बदाम काढून घेतले. त्यानंतर घरात आणखी सोने व रोख रक्कम कुठं आहे सांगा, नाहीतर तुम्हाला मारतो असा दम भरला. यावेळी चोरट्याने त्यांच्या कपाटातील सोन्याचे गंठण, बोरमाळ, चांदीचे दागिने असा ऐवज व रोख ७० हजार रुपये काढून घेतले. घोडके यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण तीन लाख ६२ हजार रुपयाची चोरी केली. या दोन्ही घटनेत चार अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी महादेवी कोरे व त्यांची आई भौरव्वा यांना मारहाण करून तसेच रेवप्पा घोडके यांच्या घरातील लोकांना मारहाण करून एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा चोरी केली. 

या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे डीवायएसपी गणेश शिंदे, पीएसआय अमितकुमार करपे, पीएसआय राज डांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट घेतले. श्वानपथक मागवले मात्र त्याला चोरट्यांचा माग मिळाला नाही. मंद्रूप पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांचा तपास करीत आहेत. या प्रकरणी महादेवी गौरप्पा कोरे राहणार गुंजेगाव रोड, कंदलगाव यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पीएसआय अमितकुमार करपे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments