Advertisement

Responsive Advertisement

१९८ गावांना २२९ टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा; अन्यथा रस्त्यावर उतरू! – नामदेव पवार यांचा सरकारला इशारा

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई आणि चारा टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील १९८ टंचाईग्रस्त गावांना २२९ टँकरद्वारे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी प्रमुख मागणी पवार यांनी केली आहे. केवळ कागदोपत्री टँकर सुरू असल्याचे दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात प्रत्येक टंचाईग्रस्त गाव आणि वाडी-वस्तीपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नामदेव पवार म्हणाले, "शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र, आज त्याच्याच गावात पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांना खाण्यासाठी चारा नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. टँकरची संख्या केवळ कागदावर दाखवून उपयोग नाही. १९८ गावांपर्यंत २२९ टँकर प्रत्यक्षात पोहोचले पाहिजेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा रयत शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल."

पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी अधिक आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही नामदेव पवार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments