पंढरपूर - प्रतिनिधी : (दि. १५) : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना मातीचा मोठा ढिगारा कोसळून चार कामगार मातीखाली अडकल्याची दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
आंबे येथील विहीरमालक दत्तात्रय निवृत्ती शिंदे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत मंगेश मोरे (वय ३५), सिद्धेश्वर घाडगे (वय ४५), आबासाहेब घोडके (वय ५०) आणि तानाजी घोडके (वय ५४) हे चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशामक दल तसेच संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेत बचावकार्याची सद्यस्थिती जाणून घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आवश्यक ती गती देण्याबरोबरच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दुर्घटनास्थळी उपस्थित असलेल्या अडकलेल्या कामगारांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. त्यांना धीर देत प्रशासनाकडून बचावकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
सध्या पंढरपूर नगरपालिका अग्निशामक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आणि नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 Comments