सोलापूर - प्रतिनिधी : आगामी काळात जगभरात सोलापूर शहर मोफत बससेवेसाठी ओळखले जाईल. मोफत बससेवेचे एक उत्तम मॉडेल सोलापूरमध्ये उभे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी केले.
आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशनच्या वतीने सोलापूर शहरातील दोन मार्गांवर मोफत प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली. या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेवक सात्विक बडवे, बिज्जू प्रधाने, आप्पाजी मदने फाऊंडेशनचे महादेव आप्पाजी मदने, उत्तम आप्पाजी मदने, बाळासाहेब मदने, अनिल कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र मदने म्हणाले की, सोलापूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सोलापूरकरांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी तोट्यात असलेल्या परिवहन बससेवेला कामगार आणि शहरवासीयांच्या सहकार्याने नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच सोलापूरकरांना चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळाले.
कामगार आणि मजुरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या नागरिकांची संख्या असल्याची जाणीव त्यावेळी झाली. परिवहन विभागातील कर्मचारीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असल्याचे निदर्शनास आले. अशा कामगारांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आपण परिवहन विभागाचा कार्यभार सांभाळला होता.
सोलापूरच्या परिवहन व्यवस्थेला पुन्हा चांगले दिवस यावेत, शहरातील सर्वसामान्य जनतेला मोफत आणि सुरक्षित बससेवा मिळावी, या उद्देशाने आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशनच्या वतीने निलम नगर आणि राजेंद्र चौक या दोन मार्गांवर मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा दैनंदिन खर्च मदने फाऊंडेशन करणार असून प्रवाशांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे, अशी माहितीही राजेंद्र मदने यांनी दिली.
राजेंद्र मदने यांचे कार्य कौतुकास्पद – आमदार सुभाष देशमुख
राजेंद्र मदने यांनी आरटीओ आणि परिवहन अधिकारी म्हणून काम करताना सोलापूरकरांसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली. संपूर्ण राज्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अनेक गरजू आणि गरीब नागरिकांना त्यांनी मदत केली. प्रामाणिकपणे काम करून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी आपले कर्तव्य बजावले. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही सोलापूर शहराचा विचार करून नागरिकांसाठी उपक्रम राबवणारे अधिकारी म्हणून राजेंद्र मदने हे सोलापूरकरांच्या कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य – महापौर विनायक कोंड्याल
राजेंद्र मदने यांनी सोलापूरकरांप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून दाखवून दिली आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून सोलापूर महानगरपालिकेकडून त्यांना या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
मोफत बससेवेसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – आयुक्त सचिन ओंबासे
राजेंद्र मदने यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूरकरांसाठी मोफत बससेवेचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केले.
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनविण्याचे आवाहन
सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मोफत बससेवेच्या या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन या उपक्रमाला आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिल्यास सोलापूर शहराला मोफत बससेवेचे आदर्श मॉडेल बनविण्यास वेळ लागणार नाही, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भार न पडता सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू झालेला हा उपक्रम सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
0 Comments