Advertisement

Responsive Advertisement

बोगस डॉक्टरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम ! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा दणका : शासकीय रुग्णालयांत दर्जेदार उपचार द्या; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही ! आरोग्य यंत्रणेला स्पष्ट इशारा; सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाईचे निर्देश

सोलापूर - प्रतिनिधी : सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

सोलापूर येथे आयोजित आरोग्यविषयक आढावा बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सेवा संचालक डॉ. कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, अभिराज सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयांवरील जनतेचा विश्वास वाढवा!

शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय उपकरणांचा, औषधांचा आणि आरोग्य साहित्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून रुग्णांना उत्तम उपचार देणे आवश्यक आहे. शासनाकडून दर्जेदार औषधे आणि विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ रुग्णांपर्यंत पोहोचला पाहिजे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी परस्पर समन्वयाने काम करून गोरगरीब नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी. शासकीय रुग्णालयांबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी उपचारांची गुणवत्ता आणि रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत कारवाई!

सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीरतेने घेण्याची गरज असून, अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने तपासणी करून बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

या निर्देशामुळे जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून उपचार घेताना नागरिकांची होणारी फसवणूक आणि आरोग्याला निर्माण होणारा धोका रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी तपासणी मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

'माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला गती द्या!

'माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियान यशस्वी करण्यासाठी जन आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेने एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले.

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना आवश्यक सुविधा मिळतात का, रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात का आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणेचा योग्य वापर होतो का, याबाबतही आढावा घेण्यात आला.

जन आरोग्य समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवून गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी भूमिका बजावावी. आरोग्य सुविधांच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही मंत्री आबिटकर यांनी दिला.

जिल्हा सामान्य व महिला रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी!

सोलापूर-सांगली आरोग्य संवाद यात्रेनिमित्त मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा महिला व नवजात शिशु रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅब आणि अतिदक्षता विभागाची पाहणी करून तेथील उपचार व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली.
रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन दाखल रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. रुग्णांना मिळणारे उपचार, औषधांची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली. रुग्णांना उपचार घेताना कोणत्या अडचणी येतात, याचीही माहिती घेतली.
तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन कक्षाची पाहणी करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला. या योजनांमधून मिळालेल्या उपचारांचा अनुभव जाणून घेत रुग्णांना येणाऱ्या अडचणींबाबतही माहिती घेतली.


या पाहणी व आढावा बैठकीच्या माध्यमातून शासकीय आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध सुविधा, त्रुटी आणि रुग्णांच्या अडचणी समजून घेण्यावर मंत्री आबिटकर यांनी भर दिला.

आता केवळ आदेश नकोत, प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा!

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, तसेच बोगस डॉक्टरांच्या जाळ्यात अडकून कोणाचेही आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत बोगस डॉक्टरांविरोधात नेमकी किती कारवाई होते, शासकीय रुग्णालयांतील सुविधा कितपत सक्षम होतात आणि गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यासाठी कोणते ठोस बदल घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रुग्णसेवा ही केवळ शासकीय जबाबदारी नसून ती जनतेच्या विश्वासाशी जोडलेली आहे. हा विश्वास टिकवण्यासाठी केवळ बैठका, सूचना आणि आदेश न देता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रत्यक्षात किती सक्रिय होते आणि बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments