Advertisement

Responsive Advertisement

जेलरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बालाजी चौकात हातभट्टी दारूची वाहतूक करणारा एकजण ताब्यात ! १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त; २४० लिटर हातभट्टी दारूसह दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कारवाई करत बालाजी चौकात हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेतले. या कारवाईत २४० लिटर हातभट्टी दारू आणि सुझुकी एक्सेस दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी प्रभातगस्त घालत होते. यावेळी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी चौक येथे एम.एच १३ ईए ८८८७ क्रमांकाच्या सुझुकी एक्सेस  दुचाकीवरून ३ रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारूची संशयास्पदरीत्या वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली असता, त्याचे नाव नागनाथ शंकर पवार (वय ४९, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) असे असल्याचे समोर आले.

त्याच्याकडून प्रत्येकी ८० लिटर क्षमतेच्या ३ रबरी ट्यूबमधील एकूण २४० लिटर हातभट्टी दारू, अंदाजे २४ हजार रुपये किमतीची, तसेच अंदाजे ९० हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस  दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, विभाग एक, अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील, पोलीस निरीक्षक जयदीप केळेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गावडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल व्हनगुंटी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments