Advertisement

Responsive Advertisement

घरकुल पूर्ण झाले, मात्र शौचालयाचा निधी रखडला !लाभार्थ्यांच्या तक्रारींची सीईओ कुशल जैन घेणार दखल; घरकुल योजनांचा आढावा घेणार


सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात विविध योजना अंतर्गत मंजूर झालेल्या चाळीस हजार घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. घरकुलासाठी जो निधी सांगितला जातो त्यातील शौचालयाचा निधीच मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घरकुलाचा आढावा घेण्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील गरजूंना घरकुल मंजूर केले जाते. घरकुल मंजूर होताना निधी कसा मिळेल हे सांगितले जाते. घरकुलासाठी दोन लाख मिळतात हे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात बांधकामाचे एक लाख वीस हजार लाभार्थ्यांना मिळाल्यानंतर इतर निधीबाबत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही व प्रतीक्षा ठेवले जाते. अनेक लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी निधीच दिला जात नाही. त्याची वेगवेगळी कारणे आता पुढे आले आहेत. तरीही गरजू लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी तात्काळ निधी देण्याबाबत आढावा घेतला जाईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्पष्ट केले आहे.

घरकुलासाठी कशा पद्धतीने निधी मिळतो हे समजावून घेणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) आणि इतर राज्यस्तरीय घरकुल योजनांनुसार (उदा. रमाई, शबरी आवास) लाभार्थी कुटुंबाला घर बांधण्यासाठी ₹१,२०,००० ते ₹१,३०,००० चे मूळ अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते.तथापि, वाढत्या बांधकाम खर्चामुळे महाराष्ट्र शासनाने यामध्ये अतिरिक्त वाढ केली असून, इतर योजनांच्या समन्वयातून लाभार्थ्याला मिळणारा एकूण निधी खालीलप्रमाणे वाढला आहे:

एकूण मिळणारा निधी आणि त्याचे स्वरूप

जर तुम्ही सर्व योजनांचे लाभ एकत्र केले, तर घरकुलासाठी एकूण ₹२,००,००० पर्यंतची मदत मिळू शकते.

अनुदानाचा प्रकार मिळणारी रक्कम तपशील

मूळ घरकुल अनुदान ₹१,२०,००० सर्वसाधारण (मैदानी) भागासाठी (डोंगराळ/दुर्गम भागात ₹१,३०,००० मिळतात).
महाराष्ट्र शासन वाढीव निधी ₹५०,००० राज्य सरकारने मंजूर केलेल्या वाढीव निधीपैकी ₹३५,००० बांधकामासाठी आणि ₹१५,००० सौर ऊर्जा संच (Rooftop Solar) लावल्यावर मिळतात.
शौचालय बांधकाम ₹१२,००० स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी अतिरिक्त निधी.
रोजगार हमी योजना (MGNREGS) मजदुरी खर्च घरकुलाच्या कामावर स्वतः मजदुरी करण्यासाठी ९० ते ९५ दिवसांचा रोजगार (मजदुरीचे पैसे) मिळतो.

घरकुलाचा निधी ४ हप्त्यांमध्ये मिळतो

पंतप्रधान आवास योजनेचा मूळ निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात बांधकामाच्या टप्प्यानुसार खालीलप्रमाणे जमा होतो:
1. पहिला हप्ता: ₹१५,००० (घरकुल मंजूर झाल्यावर)
2. दुसरा हप्ता: ₹७०,००० (पाया किंवा प्लिंथचे बांधकाम       पूर्ण झाल्यावर)
3. तिसरा हप्ता: ₹३०,००० (भिंती पूर्ण होऊन छताच्या/         पत्राच्या टप्प्यावर आल्यावर)
4. चौथा हप्ता: ₹५,००० (घर पूर्णपणे तयार झाल्यावर)

पण यातील रोजगार हमी आणि शौचालयाचा निधी मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना बरीच खटपट करावी लागते. खरे तर ग्रामसेवकाने याबाबत लाभार्थ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. पण शौचालय व रोजगार हमीचा निधी मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक हेलपाटे घालावे लागत असल्याचे दिसून आले आहे. लाभार्थ्याने यापूर्वी शौचालयाचा लाभ घेतला असेल तर त्याला हे बारा हजार रुपये मिळत नाहीत. याशिवाय लाभार्थी ज्या गावचा आहे ते गाव जर ओडीएफ प्लस मध्ये (गाव हागणदारी मुक्त घोषित झाले असेल तर) आले असेल तर निधी मिळण्यास अडचण होते.

तरुणाई मोटर सायकलवर बाहेर...

गावे हागणदारी मुक्त घोषित झाले असले तरी आता एक वेगळीच समस्या समोर आली आहे. घरात शौचालय नसल्यामुळे लाखाची मोटरसायकल व 25 हजाराचे मोबाईल हातात असलेले तरुण सायंकाळी गावाबाहेर जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक गावाशेजारी हे गंभीर चित्र दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments