Advertisement

Responsive Advertisement

दुष्काळाच्या बांधावर जिल्हाधिकारी; शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून तातडीने आदेश!


“छावणी नको, थेट अनुदान द्या!” — शेतकऱ्यांचा स्पष्ट सूर; पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना
सोलापूर - प्रतिनिधी : दुष्काळाची तीव्रता कागदोपत्री अहवालातून नव्हे, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा प्रत्यक्ष दौरा केला. कोरडी पडलेली शेती, आटलेल्या विहिरी, पाण्यासाठीची धावपळ तसेच जनावरांच्या चाऱ्याची चिंता त्यांनी प्रत्यक्ष पाहिली.

यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडत “आम्हाला छावणी नको; नुकसानभरपाई आणि चाऱ्याचे अनुदान थेट खात्यात द्या,” अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.

बांधावरच पाहणी; नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचोळी आणि शिरसी या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पिकांची स्थिती, नुकसानीची तीव्रता, विहिरींची पाणीपातळी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली.

दुष्काळाची परिस्थिती प्रत्यक्ष पाहताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी पंचनामे अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

“छावणी नको, अनुदान थेट खात्यात द्या!”

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास चारा डेपो अथवा चारा छावण्या उभारण्याऐवजी चाऱ्यासाठीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

टँकरच्या पाणीपुरवठ्याचीही तपासणी

लेंडवे चिंचोळी येथे टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळते की नाही, याची माहिती त्यांनी घेतली. तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे का, याचीही तपासणी केली.

पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नियोजित वेळेनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

सांगोल्यातही दुष्काळाची पाहणी

यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील वाकी (घेरडी), बुरलेवाडी, वाडेगाव, वाणीचिंचोळी आणि राजापूर या गावांना भेटी दिल्या. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, विहिरींची पाणीपातळी, जनावरांसाठीचा चारा तसेच पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

दुष्काळाच्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि इतर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गाऱ्हाणे ऐकले; आता मदतीची प्रतीक्षा

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी आपली व्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रशासनानेही परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

दुष्काळाच्या बांधावर प्रशासन पोहोचले, शेतकऱ्यांचा आवाज ऐकला गेला; आता या मागण्यांवर प्रत्यक्ष मदत आणि शासकीय कार्यवाही कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार बाळूबाई भागवत, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments