Advertisement

Responsive Advertisement

नवरात्रोत्सवात रात्री १० नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

सोलापूर शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त; १० पथके तैनात, चौकाचौकांत नाकाबंदी

सोलापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रीची गस्त अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १० नंतर विनाकारण घराबाहेर फिरणारे, मोकळ्या मैदानात किंवा आडोशाला थांबणारे तसेच टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, यासाठी शहरात १० विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी केली जाणार आहे.

शहरात सुमारे ४०० नवरात्रोत्सव मंडळे असून, १८ ते २० ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा व दांडिया कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी महिला पोलिसांसह विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.

टवाळखोरांची मस्ती खपवून घेणार नाही

नवरात्रोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या टवाळखोरांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. अशा व्यक्तींना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी दिला आहे.

नवरात्रोत्सवातील बंदोबस्तासाठी सुमारे ५०० होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलिस दलाची (SRPF) एक तुकडी मागविण्यात आली आहे. शहरातील सातही पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त स्वतः रात्रीच्या गस्तीमध्ये सहभागी होणार आहेत.

रात्री १० नंतर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अडविल्यास, घराबाहेर फिरण्याचे ठोस कारण सांगावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता अन्य दुकाने रात्री १० नंतर सुरू ठेवता येणार नाहीत.

विशेषतः टवाळखोरांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा राहणार असून, रात्री १० नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments