Advertisement

Responsive Advertisement

नवरात्रोत्सवात सोलापूर रूपाभवानी मंदिरात भाविकांसाठी सुविधांचे नियोजन


दर्शनरांग, स्वच्छता, पाणी, प्रकाशयोजना व गर्दी नियंत्रणावर महापौर विनायक कोंड्याल यांचा भर
मुख्य पुजारी संजय (राजू) पवार यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार
सोलापूर - प्रतिनिधी : दि. २ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने विविध सुविधांचे नियोजन सुरू केले आहे. याच अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी शुक्रवारी मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला.
नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शनरांग, प्रवेश व निर्गमन मार्ग, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना तसेच गर्दी नियंत्रण याबाबत महापौरांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

प्रवेश-निर्गमन मार्गाचे नियोजन

भाविकांना मंदिरात प्रवेश करताना तसेच दर्शनानंतर बाहेर पडताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश आणि निर्गमन मार्गाचे स्वतंत्र नियोजन करण्यावर भर देण्यात आला. गर्दीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन, मंदिर प्रशासन आणि उत्सव समितीने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्वच्छता, पाणी आणि प्रकाशयोजनेवर विशेष लक्ष

उत्सव काळात मंदिर परिसरात नियमित साफसफाई, कचरा संकलन तसेच स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरातील आवश्यक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “नवरात्रोत्सव हा भाविकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा उत्सव आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सुलभ, सुरक्षित आणि निर्विघ्न दर्शनाला प्रशासनाचे प्राधान्य राहील.”
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक अविनाश पाटील, गौतम कसबे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सायक आयुक्त युवराज गाडेकर, नगर अभियंता नीलकंठ मतपती, विभागीय अधिकारी श्री. बक्षी तसेच मंदिराचे मुख्य पुजारी संजय (राजू) पवार आणि रूपाभवानी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष व ट्रस्टी उपस्थित होते.

दरम्यान, मंदिराचे मुख्य पुजारी संजय (राजू) पवार यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर प्रशासन आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महापौरांनी नवरात्रोत्सवाच्या नियोजनातील विविध बाबींची माहिती घेतली. महापालिका, मंदिर प्रशासन आणि उत्सव समिती यांच्या समन्वयातून उत्सव काळात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments