प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर - प्रतिनिधी : प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक आमदार ओमप्रकाश उपाख्य बच्चू कडू हे दिव्यांग बांधवांचे संघटन आणि त्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सन्मानासाठी ते प्रयत्नशील आहेत. आमदार बच्चू कडू हे येत्या ९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, यावेळी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांनी केले.
'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।' या ब्रीदावर कार्यरत असलेल्या संस्थापक आमदार ओमप्रकाश (बच्चूभाऊ) कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगाव शाखेचे उद्घाटन गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजय पुरी, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्यासह संस्थेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास कासेगावचे उपसरपंच शहाजहान शेख, उत्तर सोलापूर तालुका महिलाध्यक्ष सविता डोंगरे, उत्तर सोलापूर तालुका संपर्कप्रमुख होनमाने, कोंडी गावचे शाखाप्रमुख आनंद बेलभंडारे आणि ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. नामफलक अनावरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात शाखाध्यक्ष राजकुमार वाडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांनी मार्गदर्शन केले.
दिव्यांग बांधव शरीराने कमजोर असले तरी मनाने मजबूत आहेत. त्यांच्या वाटचालीला आधार देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राज्यस्तरावर काम करीत आहे. आगामी काळात दिव्यांगांचा निर्वाह निधी वाढविण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आग्रही असल्याचे विजय पुरी यांनी सांगितले. तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेसोबत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपसरपंच शहाजहान शेख यांनी ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शासनाच्या निर्देशानुसार भविष्यातही सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शाखा उपाध्यक्ष गणेश माने, शाखा सचिव करुणा जाधव, शाखा खजिनदार सुखदेव गायकवाड, शाखा संपर्कप्रमुख इक्बाल शेख, विश्वजीत चौगुले, उस्मान शेख यांच्यासह शाखा सदस्य मनोहर जाधव, तुकाराम सुरवसे, वसंत गुरव, सुधाकर परीट, श्रीकांत हब्बु, शशिकांत चव्हाण, अनिल मेटकरी, उमेश स्वामी, दीपक जाधव, सोहेल शेख, लखन गुरव, सत्यवान गायकवाड, प्रमोद चौगुले, हुजेफा तांबोळी, सहदेव हट्टीवाले, बाळकृष्ण भाजीभाकरे, मिराबाई जाधव, ज्ञानेश्वरी अवताडे, नीता काळे, कावेरी जाधव, शीतल हेडे, दिपाली चव्हाण, संध्या जाधव, द्वारकाबाई चव्हाण, प्रियंका भोजने, दिपाली भोजने, रसिका भोज आणि लक्ष्मी लबडे आदी उपस्थित होते.
0 Comments