अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवत मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील उसाच्या शेतात कारवाई करून तब्बल २११ किलो १०० ग्रॅम वजनाची गांजासदृश्य झाडे जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये आहे.
सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
गोपनीय माहितीवरून कारवाई
२८ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांचे पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, आळगी येथील एका शेतात उसाच्या पिकामध्ये गांजासदृश वनस्पतींची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित शेतात पाहणी केली.
पोलिसांच्या पाहणीत उसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी सुमारे १२ फूट उंचीची गांजासदृश झाडे आढळून आली. पंचनाम्याद्वारे कारवाई करत एकूण २४० झाडे जप्त करण्यात आली. त्यामध्ये २१० जिवंत आणि ३० वाळलेली झाडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम भरले.
या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५३१/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे पोहेकॉ/१५३४ मोसलगी, पोहेकॉ/४९६ चिंचोळकर, पोकॉ/९७० कोळी, पोकॉ/६९ धुमाळ, पोकॉ/१३१६ डोंगरीतोट, मपोकॉ/२१७० हडपद, चामपोकॉ/५६ धनगर, पोकॉ/८८६ कोळी, पोकॉ/७२१ सुर्यवंशी, पोहेका /१४५५ पाटील, पोहेकॉ/१७८६ बिराजदार, पोका /१९५३ अन्सारी, पोकॉ/७६२ शिंदे, पोकॉ/२९६ पवार, पोकॉ/१३१६ डोगरीतोट, पोकॉ/१५२८ माने, पोना/५८१ कोले यांनी बजावली आहे.
0 Comments