सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा आदेश
सोलापूर - प्रतिनिधी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा आणि मुरघास जिल्ह्याबाहेर किंवा अन्य राज्यात वाहतूक करून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पशुधनासाठी अंदाजे पुढील १२० दिवस, म्हणजेच डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा आणि मुरघास इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांत वाहतूक करून विक्री केल्यास स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य चारा टंचाई तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
जून २०२७ अखेरपर्यंत आदेश लागू
या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा व मुरघास इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून जून २०२७ अखेरपर्यंत लागू राहणार आहे.
आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय, पोलीस, कृषी, पशुसंवर्धन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
0 Comments