Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ; १०० टक्के क्षेत्राचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश; ९२ गावांत ८२ टँकर, ३३ विहिरी व १३ बोअर अधिग्रहित

सोलापूर - प्रतिनिधी  : राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ नुसार दुष्काळ जाहीर केला असून, सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांना त्याची अंमलबजावणी आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्ह्यातील १०० टक्के शेती क्षेत्राचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम २०२६ मधील ट्रिगर-१ दुष्काळाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. यापुढे १० टक्के नमुना पाहणी न करता प्रत्येक शेतात व प्रत्येक बांधावर जाऊन प्रत्यक्ष दिसणारे नुकसान पंचनाम्यात नोंदवावे. पंचनामे जिओ-टॅगिंगसह करावेत. चुकीचे पंचनामे होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दररोज सायंकाळी तालुकानिहाय एकूण क्षेत्र आणि पूर्ण झालेल्या पंचनाम्यांचा गोषवारा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

टँकर प्रस्तावाला ४८ तासांत मंजुरी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टँकर मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत मंजुरी देण्याची कार्यवाही करावी. प्रस्ताव टपालाने पाठविण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासांत संबंधित गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गावातील रस्ते अरुंद असल्यास मोठ्या टँकरऐवजी छोट्या टँकरचा वापर करावा. एका ठिकाणी टँकर उभा करून तेथून पाणी वितरणाची व्यवस्था करावी. सर्व टँकरना जीपीएस असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

९२ गावांत टंचाई उपाययोजना

दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यातील ९२ गावांमध्ये टंचाई उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८२ टँकर, ३३ विहिरी आणि १३ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

तालुकानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे—

बार्शी : १२ गावे, २ टँकर, ५ विहिरी, ५ बोअर

करमाळा : ११ गावे, ८ टँकर, ८ विहिरी, २ बोअर

मंगळवेढा : १६ गावे, १८ टँकर

मोहोळ : सध्या टँकर/विहीर/बोअर मंजूर नाही

पंढरपूर : सध्या टँकर/विहीर/बोअर मंजूर नाही

उत्तर सोलापूर : ५ गावे, ७ टँकर

दक्षिण सोलापूर : १ गाव, १ टँकर

सांगोला : १९ गावे, २४ टँकर

माढा : १३ गावे, १३ टँकर, १० विहिरी, ३ बोअर

अक्कलकोट : ८ गावे, २ टँकर, ३ विहिरी, ३ बोअर

माळशिरस : ७ गावे, ७ टँकर, ७ विहिरी


चारा, धान्य आणि पाणीसाठ्याचे नियोजन

जिल्ह्यात सध्या १०० ते १२० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने गावनिहाय व तालुकानिहाय चारा उपलब्धतेचे नियोजन करून दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. चारा बियाणे खरेदीसाठी नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरवठा विभागाने अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेतील कार्डधारक वगळता इतर रेशनकार्डधारकांची माहिती तयार करून त्यानुसार धान्याची मागणी शासनाकडे नोंदवावी. याबाबतचा अहवाल आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

उजनी धरणात ९२ टक्के पाणीसाठा असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. मात्र लहान व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. नगरपालिका क्षेत्रातील उपलब्ध पाणी किती दिवस पुरेल आणि पुढील काळात कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचाही अहवाल मागविण्यात आला.

बळीराजा पानंद रस्त्यांची २५० कामे

सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांनी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेतील किमान २५० कामे प्रशासकीय मान्यतेच्या स्तरावर आणावीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच व्हीजी रामजी योजनेअंतर्गत मंजूर ७२३ कामांपैकी दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक कामे तातडीने सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घ्यावा.

मृद व जलसंधारण विभागाने दुष्काळी गावांमध्ये जलसंधारणाची कामे केवळ औपचारिकपणे प्रस्तावित न करता निधी उपलब्धतेनुसार काटेकोर नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मगर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments