Advertisement

Responsive Advertisement

दरोड्याच्या तयारीत सात सराईत गुन्हेगार जेरबंद!शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; पिस्तूल, ५ जिवंत राऊंडसह तलवारी-खंजीरांचा मोठा साठा जप्त.

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत राऊंड, दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, छन्नी, लांब दोरखंड, हॅन्डग्लोज, बनावट नंबर प्लेट, कलर स्प्रे, सात मोबाईल, चारचाकी व मोटारसायकल असा तब्बल १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांकडून विशेष गस्त सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
दि. २० सप्टेंबर रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व त्यांच्या पथकातील कर्मचारी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस शिपाई अमोल यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित इसम मुळेगाव रोडवरील अमर ज्योती नगर, नरसिंग नगर परिसरातील प्लॉट नं. ८३ जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत जमले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे व वाहने आहेत.
माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.
पोलिसांना घटनास्थळी काळ्या रंगाची महिंद्रा XUV 500 आणि यामाहा मोटारसायकल आढळून आली. वाहनाजवळ सात इसम संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. पोलिसांनी अचानक कारवाई करत सातही जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे - १) मनदीपसिंग दयासिंग संधू (४३), २-) बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (२५), ३) अंकुर रामकुमार प्रतापसिंह (२८), ४) लक्ष्मण नामदेव जगताप (३५), ५) सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल (४२), ६) दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (३४) ७) आणि राजेश कन्नीराम राठोड (४४) अशी आहेत.

पिस्तूलासह पाच जिवंत राऊंड

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये अंकुर रामकुमार प्रतापसिंह याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत राऊंड मिळून आले. त्यानंतर महिंद्रा XUV 500 वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, एक छन्नी, लांब दोरखंड, तीन जोडी हॅन्डग्लोज, दोन नंबर प्लेट, कलर स्प्रे बॉटल आणि सात मोबाईल असा मुद्देमाल आढळला.

पोलिसांनी या साहित्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर राजेश राठोड याने त्या रात्री सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याचा त्यांचा बेत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी

अटक केलेल्या सातही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि हत्यार कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(२), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे सोलापूर शहरात मोठा दरोडा घालण्याचा संभाव्य कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा तसेच त्यांनी आणखी कोणत्या गुन्ह्यांची तयारी केली होती, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, निलेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments